ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर, 1 जुलै: ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाच्या वतीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, संबंधित खासदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाज, शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, लोकहिताचे प्रश्न मांडणे तसेच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे ही संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना असल्याचे संघाने नमूद केले आहे.

पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी खासदार संजय दिना पाटील यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत या प्रकाराचा पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासोबतच खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची केवळ दिलगिरी व्यक्त न करता जाहीर आणि लेखी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही पत्रकार संघाने केली आहे. तसेच भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध शासनाने कठोर धोरण अवलंबावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणासंदर्भातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघातील खालील पदाधिकारी व सदस्य पत्रकारांच्या सह्या आहेत.
- किशोर नारायण लोहार – देशोन्नती
- भिकन सदाशिव पाटील – पुण्यनगरी
- रविकिशोर आर. पांडे – देशदूत
- हेमशंकर तिवारी – लोकमत
- सुनील आर. लोहार – लोकमत
- दिलीप जैन – सत्यजीत न्यूज
- चिराग शहा – सत्यजीत न्यूज
- दीपक मुलमुले – दीपलक्ष्य न्यूज
- ईसा तडवी – सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज
- रोशन जैन – लोकमत
- चंद्रकांत माहोर – दिव्य मराठी






