मुंबई, 22 जुलै: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी महायुती सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २२ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागाने योजनेची सर्व तयारी पूर्ण केली असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, कर्जमाफी प्रक्रियेसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आयकर विभागाकडील आवश्यक माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वी लागू असलेल्या काही जाचक अटी सरकारने रद्द केल्यामुळे अतिरिक्त ३६ लाख शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच, २०१९ मधील कर्जमाफी योजनेत लाभासाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा वाढवून ती २ लाख रुपये करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी नवीन कर्ज घेण्याची अटही सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे सुमारे २३ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
हेही वाचा: Pachora News: पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं प्रकरण काय?






