ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 जुलै: शहरातील हजारो रेशन लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या रेशन दुकानदाराविरोधात काँग्रेसने अखेर आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांच्या दालनासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि संबंधित रेशन दुकानदाराचा पुरवठा तात्काळ बंद करून तो सहारा महिला बचत गटाकडे वर्ग करण्याचे लेखी आदेश देण्यात आले.
शहरातील देशमुखवाडी भागातील रेशन दुकानदाराकडे ५३३ शिधापत्रिकाधारकांचे सुमारे २,१६६ लाभार्थी जोडलेले आहेत. मात्र, एप्रिल महिन्यातच जून महिन्याच्या पावत्या काढल्यामुळे झालेल्या गंभीर त्रुटीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी यापूर्वीही तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ३० जून रोजीही मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी चौकशी करून लवकरच न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्याने सचिन सोमवंशी यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानुसार काँग्रेसने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
तहसीलदार विजय बनसोडे कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “लाभार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका सचिन सोमवंशी यांनी घेतल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला.
सुमारे तीन तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर तहसीलदार विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत आणि पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे यांनी संबंधित रेशन दुकानदाराविरुद्ध लेखी कारवाई केल्याचे आंदोलनकर्त्यांना कळविले. तसेच संबंधित दुकानदाराचा धान्य पुरवठा बंद करून तो सहारा महिला बचत गटाकडे वर्ग करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मणियार, एससी सेल अध्यक्ष शंकर सोनवणे, युसुफ उस्मान, रसुल मिस्तरी, सलीम शेख, नजीर शेख, अस्लम टकारी, जाकीर बागवान, नितीन शिंपी, तौफिक अली, मुशिर सय्यद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरीबांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार –
यावेळी बोलताना काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले, “रेशन दुकानदारांच्या निष्काळजीपणामुळे हजारो गरीब लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नव्हती. त्यामुळे जनतेच्या हक्कासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले. जोपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.”






