चाळीसगाव, 1 ऑगस्ट: डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै-२०२६ निमित्त चाळीसगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जलजन्य, कीटकजन्य तसेच कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना डेंग्यूसह विविध संसर्गजन्य आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, ग्रामीण रुग्णालय चाळीसगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन जाधव, डॉ. बागडे तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंपाबाई कलंत्री शाळा, जय हिंद ज्युनिअर कॉलेज आणि अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे जनजागृती शिबिरे घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थी तसेच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, जलजन्य आजार आणि कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपचार, रोगप्रतिकारासाठी घ्यावयाची काळजी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
या शिबिरात अवैद्यकीय सहाय्यक महेश सूर्यवंशी, आरोग्य सेवक दीपक ठाकरे आणि चंद्रकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय हिंद शाळेचे प्राचार्य अभिजित खलाने, चंपाबाई कलंत्री शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली तडवी यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी, जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






