धुळे, 8 सप्टेंबर : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टीका केली. ते धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले गिरीश महाजन? –
वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर देखील निघाले नाही. आम्ही दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवले पण अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेत असताना मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकली नाही. याला सर्वस्वी जबाबदार म्हणून उद्धव ठाकरेच आहे. म्हणून मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरेच दोषी असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरेंवर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांना मदत दिली जाईल –
उत्तर महाराष्ट्रात शंभर वर्षात ऑगस्टमध्ये पहिल्यांदाच सरासरीपेक्षा इतका कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता लवकरच पंचनामे करत अग्रीम मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
भाजपला मिळणार यश –
मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. वन नेशन वन इलेक्शन निर्णय फायदा तोटा बघून नाही, यावेळी पार्लमेंट मध्ये 325 चा आकडा भाजप क्रॉस करेल. तसेच महाराष्ट्रात 48 जागांचा आकडा भाजप क्रॉस करेल, असा विश्वासही मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.