सोलापूर, 9 ऑगस्ट: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात कुणबी समाजाची चार प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील सरकारवर आक्रमक झाले आहेत. माढा येथे झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत इशारा दिला. “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो. तशी वेळ आली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मात्र, मला त्या वाटेवर नेऊ नका,” असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा –
माढ्यातील सभा दुपारी 3 वाजता होणार होती. मात्र, जरांगे पाटील यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे सभा रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. माढ्यात पोहोचताच समर्थकांनी जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर झालेल्या सुमारे तासभराच्या भाषणात जरांगे पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला.
जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. “मी एक वर्ष फडणवीसांना काही बोललो नाही. बावनकुळेंमुळे फडणवीस अडचणीत येत असतील तर त्यांनी त्यांना का सांभाळायचे? आता मी कोणालाही सोडणार नाही,” असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या हक्कांमध्ये अडथळा आणणाऱ्यांना समाज माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
माढ्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे झालेल्या सभेतही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “फडणवीस आणि शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा माज मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असे जरांगे म्हणाले.
फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.






