नवी दिल्ली, 9 ऑगस्ट: नवी दिल्ली येथे ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने ‘सिंदूर महारक्तदान यात्रा आणि महारक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान अहोरात्र झटत असताना महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानाच्या माध्यमातून उभा राहिला आहे. जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी सेवाभावातून राष्ट्रभक्ती कृतीत उतरविण्याचा संदेश या महारक्तदान यात्रेतून देण्यात आला, असे यावेळी सांगण्यात आले.
‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रमाचा उद्देश केवळ रक्तसंकलन करणे नसून, देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणे हा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक, पैलवान आणि रक्तदाते या उपक्रमात सहभागी झाले.
View this post on Instagram
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले रक्तदान –
या महारक्तदान शिबिरात शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सहभागींचा उत्साह वाढवला. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य असल्याने जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना यामुळे देशाचे संरक्षण कवच अधिक मजबूत होत असल्याचेही सांगण्यात आले.
लष्करी अधिकारी, शिवसैनिक आणि पैलवानांची उपस्थिती –
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, व्हाइस अॅडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, राज्यसभा सदस्य प्रा. डॉ. ज्योती वाघमारे तसेच महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, पैलवान आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा: मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “’मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर……!”






