जळगाव, 13 सप्टेंबर: पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अपहरण व खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तब्बल ४० दिवसांच्या अथक तपासानंतर छडा लावला. महिलेचा सख्खा भाचा प्रशांत उत्तम माळी (४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहराजवळील कानळदा फाट्याच्या परिसरातून महिलेचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला.
नेमकं प्रकरण काय? –
करंजी बु. येथे एकट्या राहणाऱ्या गं.भा. वैजंताबाई गणपत माळी (८५) या ३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे चुलत पुतणे भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांच्या खबरीवरून ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. वैजंताबाई यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने असल्याने त्यांच्या बेपत्तेपणामागे घातपाताचा संशय व्यक्त होत होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB ला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले.
एलसीबीकडून सखोल तपास –
LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. एका पथकाने संशयिताचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकाने बेपत्ता महिलेचा शोध घेतला. पारोळा, करंजी, अमळनेर, धरणगाव, घाडोदे, मुक्ताईनगर, यावल ते जळगाव असा सुमारे २५० किलोमीटरचा परिसर पिंजून काढण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध ठिकाणच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.
तपासादरम्यान ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१६ वाजता प्रशांत माळी हा वैजंताबाई यांच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसून आला. त्यानंतर काही वेळाने वैजंताबाई एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून पारोळ्याच्या दिशेने जाताना आढळल्या. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या विसंगतींमुळे पोलिसांचा संशय प्रशांत माळीकडे वळला.
पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांच्या तपासासमोर अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रशांतवर मोठे कर्ज होते. त्याने यापूर्वी मावशीकडून पैसे घेतले होते. मात्र, तिने आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर त्याचा डोळा गेला.
…..अन् आरोपीने केला मावशीचा गळा आवळून खून –
पोलिसांच्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी प्रशांतने ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे’, असे खोटे सांगून वैजंताबाईंना भाड्याच्या कारमधून सोबत नेले. दिवसभर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात गाडी फिरवत त्याने दागिन्यांची मागणी केली. मात्र, वैजंताबाईंनी दागिने देण्यास नकार दिला. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर गाडी थांबवून रुमालाने गळा आवळून त्यांचा खून केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
खून केल्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून आरोपी घरी गेला. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळ सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथून मृतदेह हस्तगत केला.
दरम्यान, आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याचे पोलिसांना सांगितले असून, उर्वरित दागिने फागणे (धुळे) परिसरात लपविल्याचेही त्याने कबूल केले आहे. चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. याप्रकरणी सुरुवातीला पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) व १४२ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खून व पुरावा नष्ट केल्याची संबंधित कलमे वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग अशोक नखाते, अमळनेर उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अथक परिश्रम करून अत्यंत कौशल्याने पार पाडली.






