बुलढाणा, 13 सप्टेंबर: भाजपा आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असून, महिलांच्या शरीरयष्टीवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप करत एका ४२ वर्षीय महिलेने बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात मित्रपरिवाराकडून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून रॅलीही काढण्यात आली. या रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले होते.
या गाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी त्यांनी श्वेता महाले यांच्यावर टीका करताना, ‘बाप तो बाप रहेगा’ हे एखाद्या पुरुषाने म्हटले तर ठीक आहे; मात्र एखाद्या महिलेने असे म्हटल्यास बापासारखे शरीर कुठून आणणार, असा सवाल केला. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आले.
नेमका वाद काय? –
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून आमदार श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना वाढदिवसानिमित्त रॅली काढून खर्च करण्यावर गायकवाड यांनी टीका केली होती. ‘वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा’, असे आवाहनही त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी श्वेता महाले यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच राजकारणातील ‘बाप’ कोण आहे, हे योग्य वेळी दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आरोप करत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






