जालना, 12 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली असून, 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मुंबईत आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
‘असे’ असेल आंदोलनाचे नियोजन –
मनोज जरांगे यांनी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, १५ सप्टेंबर रोजी पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, १७ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे, तर १८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम करण्यात येणार आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्याचे नियोजन आहे. गरज भासल्यास कोपरखैरणे येथेही मुक्काम होऊ शकतो, असे जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, मोर्चाच्या मार्गावर दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या जिल्ह्यांतून मोर्चा जाणार आहे, तेथील नागरिकांनी रस्त्यावर येऊन मोर्चाला आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर आपल्या कामावर परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन –
मुंबईतील आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची दगडफेक, जाळपोळ किंवा वाहनांची तोडफोड करू नये. वाहनचालकांनीही शांततेने वाहने चालवावीत. लोकशाही मार्गाने आंदोलन करून मराठा आरक्षणाचा हक्क मिळवायचा आहे, त्यामुळे सर्वांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, अशी आचारसंहिताही जरांगे यांनी आंदोलकांना दिली.
मुंबईपर्यंत मोर्चेकऱ्यांना पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईच्या वेशीपर्यंत वाहनांनी सोडावे आणि त्यानंतर वाहने परत घेऊन जावीत, असेही त्यांनी सांगितले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?






