जामनेर, 21 सप्टेंबर: शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मिळावा, यासाठी दाखल केलेल्या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहायकासह एका खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सोमवार २१ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले. प्रविण सुपडु गांगुर्डे (वय ४१, महसूल सहायक, तहसील कार्यालय, जामनेर) आणि योगेश रामलाल वखरे (वय ४२, व्यवसाय वकील, जामनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेत असून, शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी त्यांनी सन २०२२ मध्ये जामनेर तहसील कार्यालयात वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर तहसीलदारांकडे वेळोवेळी सुनावणी झाली असून, तो अंतिम निकालासाठी प्रलंबित होता. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या भावाने महसूल सहायक प्रविण गांगुर्डे यांची भेट घेतली होती.
दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय, जामनेर येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
पडताळणीदरम्यान खासगी इसम योगेश वखरे याने महसूल सहायक गांगुर्डे यांच्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. गांगुर्डे यांनी स्वतःसाठी वखरे याच्यामार्फत लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. सोमवारी तहसील कार्यालयात गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून वखरे याने पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आली. गांगुर्डे यांनी रक्कम स्वीकारून ती पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवली. पथकाने लाचेची रक्कम जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने व प्रदीप पोळ, आदींनी केली.
हेही वाचा: जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण






