पाचोरा, 23 सप्टेंबर: शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री, विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार 24 सप्टेंबर रोजी पाचोरा येथे ‘शिवसंवाद दौऱ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. शेतकरी, गोरगरीब, दिव्यांग तसेच विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार दिलीप लांडे यांचेसह रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार तुकाराम काते तसेच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांशी बच्चू कडू, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार दिलीप लांडे, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे संवाद साधणार असून विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
यावेळीशिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती लाभणार आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांचे वतीने करण्यात आले आहे.






