पुणे, 29 ऑक्टोबर: राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पशुधनाची चारा व पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळकाळात पशुधनाला आवश्यक असणारा चारा, चारा बियाणे व ठोंबे वाटप, वैद्यकीय उपचार व इतर अनुषंगिक सेवांचा पुरवठा अचूकपणे व्हावा, यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी एनडीएलएम, अर्थात ‘भारत पशुधन प्रणाली’ वर अद्यावत करावी, तसेच नवीन पशुधनाचे टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, मदत कार्य व सवलतींचा लाभ थेट गरजू पशुपालकांच्या पशुधनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित पशुपालकांनी तात्काळ आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.
आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी व नवीन पशुधनाच्या कानात १२ अंकी बिल्ला टोचून त्याबाबत नोंद भारत पशुधन प्रणालीवर करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संगोपन व संवर्धन करणे ही पशुसंवर्धन विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाची अचूक नोंदणी आणि टॅगिंग ‘भारत पशुधन’ प्रणालीवर करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या डिजिटल नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत चारा बियाणे, ठोंबे व इतर मदत अचूकपणे व थेट पात्र पशुपालकापर्यंत पोहोचवणे आम्हाला शक्य होईल. सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.
— डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, पुणे.






