ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. परिसर तथा बांबरुड (राणीचे) परिसरातील आदिवासी भिल्ल समाजाला त्यांच्या हक्काचे नवीन रेशन कार्ड मिळावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना निवेदन दिले.
काय आहे संपूर्ण बातमी –
आदिवासी भिल समाज बांधव हे तालुक्यातील मूळ रहिवासी असून कष्ट करून उपजीविका भागवतात. ते भूमिहीन आहेत, ते शिक्षणापासून वंचित आहेत तसेच प्रचंड दारिद्र्य त्यांच्या जीवनात आहे. असे असतानाही ते रेशन कार्डपासून वंचित आहेत. त्यांच्या हक्काचे स्वस्त धान्य त्यांना मिळावे, या मागणीसाठी शिवसेना नेत्या (ठाकरे गट) वैशालीताई सुर्यवंशी यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांची भेट घेत निवदेन दिले.
हक्काचे रेशन कार्ड द्या –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.), बांबरूड राणीचे, सामनेर, डोकल खेडा, वरसाडे तसेच लासुरे यासारख्या अनेक गावातील नवीन रेशन कार्ड व प्राधान्य अन्नपुरवठा योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठीच्या प्रकरणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यावर तातडीने निर्णय घेऊन आदिवासी भिल्ल समाज बांधवांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड द्यावेत, असे वैशाली सुर्यवंशी याप्रसंगी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख शरद पाटील, एकनाथ अहिरे, दत्तू अहिरे, संजय ठाकरे, नंदू पाटील, नाना वाघ व धरमसिंग पाटील आदी उपस्थित होते.