चाळीसगाव, 3 नोव्हेंबर : गोवंश जनावरांची कत्तल करुन मांसविक्रीची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी गोवंश जनावरांची कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्यांच्या टोळीला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
दिनांक 1 नोव्हेंबरला रात्री सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे, राकेश महाजन, पवन पाटील, आशुतोष सोनवणे पो. ना. भुषण पाटील, राकेश पाटील, पो. शिपाई विजय पाटील आणि पवन पाटील हे गस्तीवर होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना चाळीसगाव शहरातील मदिना मस्जीद जवळ डॉ. झाकीर हुसेन सोसायटी परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्री होत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष पाटील यांना मिळाली.
माहिती मिळताच त्यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकाने रात्री घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवागाव ते चौधरी वाडा रोडच्या कडेला असलेल्या सलीम खान ईस्माईला खान कुरेशी यांच्या मालकीच्या शेडमध्ये दोन व्यक्ती गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले. लगेचच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. रिजवान खान सलीम खान कुरेशी (वय-23 वर्षे) आणि इरफान खान सलीम खान (वय-23 वर्षे, दोन्ही राहणार – मदिना मस्जीद जवळ, डॉ. झाकीर हुसेन सोसायटी) असे त्यांनी सांगितले.
सहायक पोलीस निरीक्षक सागर टिकले यांनी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन 8 हजार रुपये किंमतीचे 80 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस, एक ताणकाटा, कुऱ्हाड, एक सुरी असा एकूण 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जमा केला आहे. या दोन्ही इसमांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिकले आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करत आहेत.