चाळीसगाव, 4 नोव्हेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका संभविण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरवावी, अशी मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. यासंबंधीचे निवेदनही तहसीलदार चाळीसगाव यांना देण्यात आले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक नेते लढले. राज्यातील सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्यामुळे त्यांची समाजाला खूप गरज असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका संभविण्याची शक्यता अथवा घातपात होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने जरांगे-पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी आज चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाळीसगाव तहसीलद्वारा करण्यात आली आहे.
निवेदनावर गणेश पवार, प्रशांत गायकवाड, भरत नवले, खुशाल पाटील, छोटू अहिरे, संजीव पाटील, राजेंद्र पाटील ,सुमित कापसे, तमाल देशमुख, बंडू पगार, खुशाल बिडे, दीपक चव्हाण, मिलिंद पवार, नितीन पाटील, सुमित जगताप, विकास गोसावी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे यांनी सध्या स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. जरांगे यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने परवा (2 नोव्हेंबर) अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठाआरक्षणासंदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा म्हणजेच 2 महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे.