इसा तडवी, प्रतिनिधी
नांद्रा (पाचोरा), 2 नोव्हेंबर : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, या 40 दिवसांत आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे.
त्यांच्या या उपोषणाला राज्यात जागोजागी पाठिंबा मिळत आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान, या लाक्षणिक उपोषणादरम्यान, तहसिलदार प्रवीण चव्हाण के यांनी तसेच माजी आमदार दिलीप वाघ, नितीन तावडे यांनी भेट दिली.

कुणी केलं लाक्षणिक उपोषण –
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे सकल मराठा समाज नांद्रा यांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी नांद्रा येथील गणेश सूर्यवंशी, समाधान पाटील, स्वप्नील सूर्यवंशी, नाना नामदेव पाटील, शामकांत पाटील, बापू सातपुते, मनोहर बाविस्कर, अमोल तावडे, शशिकांत पाटील, योगेश सूर्यवंशी (ग्रामपंचायत सदस्य), अमोल सूर्यवंशी (सरपंच पती), विनोद तावडे (माजी ग्रामपंचायत सदस्य) इत्यादींनी हे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकार दरबारी आमचे निवेदन द्यावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये –
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन काल सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले.