जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोन्ही मोठे नेते एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका, आरोप प्रत्यारोप करत असतात. यानंतर आता गेल्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे विधान करून चालण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाजात बदनामी झाली असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगाव जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. यामध्ये त्यांनी एक रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची दोघेही एकही संधी सोडत नाही. मात्र, आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
काय म्हणाले आमदार खडसे –
मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या मुलाच्या प्रत्येक विषयी संशयास्पद वक्तव्य केले. तसेच माझ्या आजाराविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केलं. यामुळे समाजात माझी बदनामी झाली. खोटे विधान करून छळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आज जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हा तसेच एक रुपयांचा दावा दाखल केला, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ॲड. हारुल देवरे तसेच ॲड. अतुल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांनी दावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
गिरीश महाजन यांची किंमत माझ्याजवळ एक रुपयांची आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. जिल्हा न्यायालयात एकनाथ खडसे यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तसेच एक रुपयाचा दावा दाखल केला. दरम्यान, यानंतर आता या गिरीश महाजन कसे प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.