अमळनेर, 26 जानेवारी : बालिका अत्याचार प्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. आठ वर्षीय बालिकेला घरात बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन करत अत्याचार करणाऱ्या ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग कोळी (वय 42 वर्ष, रा. चोपडा) या आरोपीविरोधात अमळनेर सत्र न्यायालयात खटला सुरू होता. दरम्यान, याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अमळनेर सत्र न्यायालयाचे न्या. पी. आर चौधरी यांनी गुरूवारी हा निकाल दिला.
बालिका अत्याचार प्रकरण –
ज्ञानेश्वर रायसिंग याने दि 26 ऑगस्ट 2023 रोजी आठ वर्षांची बालिका खेळत असताना तिला घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. दरम्यान, मुलीने हा प्रकार आपल्या आजीला सांगितला. आजीने शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली होती. त्यावरून बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती.
अवघ्या पाच महिन्यात निकाल –
सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून महिनाभरात दोषारोपपत्र दाखल केले. एसपी एम. राजकुमार यांनी खटला जलद चालविण्याची मागणी केली. दरम्यान, अवघ्या पाच महिन्यांत अमळनेर सत्र न्यायलयाने हा निकाल दिला आहे.
हेही वाचा : Nashik Crime : प्रेयसी दुसऱ्याशी चॅटिंग करत असल्याचा आला संशय; संतप्त प्रियकराने केले धक्कादायक कृत्य