नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : देशभरात येत्या तीन महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे स्वरूप जरी अंतरिम असले, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का? याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. या अर्थसंकल्पाला बजेट असेही म्हटले जाते.
मोदी सरकारद्वारे नव्या घोषणांची शक्यता-
देशाच्या अर्थमंत्री त्यांच्या कार्यकाळातील 6 व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील तीन महिन्यातच लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, सर्वसामान्य मतदारांना खूश करण्यासाठी मोदी सरकारद्वारे नव्या घोषणेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पा नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडेही आर्थिक क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागले आहे.
बजेट म्हणजे काय? –
बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमाखर्च होय. यामध्ये पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचा बेत आहे, हे सांगणारे डॉक्युमेंट याचा समावेश असतो. ब्रिटीशांच्या काळापासून दरवर्षी 28 फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर केले जात होते आणि त्याआधी रेल्वेमंत्री रेल्वे बजेट वेगळ्याने सादर करत असत. पण आता गेली काही वर्षं बजेट 1 फेब्रुवारीला सादर केले जाते आणि यामध्ये रेल्वे बजेटचाही समावेश असतो.
हेही वाचा : Bus Accident News : एसटी महामंडळाच्या नवापुर-पुणे बसचा भीषण अपघात