ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल राजपुत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या सभेत आश्वासन दिले. त्यानंतर जळगावात झालेल्या उपोषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून पुन्हा पाचोऱ्यात राजपुत समाज बांधवांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे सकल राजपुत समाजाचे महाधिवेशन पार पडले होते. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राजपुत समाजाचे महामंडळासह विविध मागण्यांसंदर्भात पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे दिलेले आश्वासन सरकरारने पुर्ण न केल्याने सकल राजपुत समाजाने जळगाव येथे दि 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करत जळगाव येथील आमरण उपोषणाबाबत माहिती करून दिली होती. आठ दिवसांत राजपुत महामंडळाची निर्मिती होईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.
मात्र, तब्बल चार महिने उलटले तरी कोणत्याही मागण्या पुर्ण न झाल्याने अखेर सकल राजपुत समाजाचे आमरण उपोषण गिरीश परदेशी यांनी सुरु केले आहे. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पप्पू राजपूत, करणी सेना तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, विलास राजपूत सुवर्णा राजपूत, दीपक राजपूत, सुनील राजपूत, देविदास पाटील, जयराम पाटील, प्रकाश पाटील, शिवराम राजपुत, ज्ञानू राजपूत, विजय राजपूत, राजेंद्र राजपूत, विनोद राऊत, विजय पाटील, रामकृष्ण पाटील, गौरव पाटील, दिलीप राऊत, गणेश देशमुख, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.
राजपूत समाजाच्या प्रमुख मागण्या –
- राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीस जातप्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे.
- वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
- समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय/निमशासकीय वसतीगृहे स्थापन करण्यात यावीत.
- समाजाच्या न्याय मागण्यांसाठी व जनहितार्थ केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
हेही वाचा : क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर, पुढच्या महिन्यात ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएलचा रणसंग्राम