अंतरवाली (जालना), 26 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या काही 16 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. राज्यातील सध्यास्थितीतील परिस्थिती पाहता आमरण उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अंतरवाली सराटीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कालपासून घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आपले आमरण उपोषण आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेली इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर त्यांनी हे उपोषण मागे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
अंतरवाली येथे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवणार आहे. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन आणि त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन. संचारबंदी केल्यामुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पुन्हा राज्यभरात फिरणार –
मराठा बांधवांच्या विनंतीवरून मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. आता त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करत आहे. मी आता गावागावात जाऊन मराठा बांधव यांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मुलभूत अधिकार असून मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : संचारबंदी उठवा सागर बंगल्यावर आलोच समजा! मनोज जरांगे माघारी, आज नेमकं काय घडलं?






