चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 20 जून: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-जे वरील जळगाव ते पाचोरा दरम्यानच्या बहुतांश गावांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. मात्र, या मार्गावरील लासगाव गाव आजही बसस्थानकापासून वंचित आहे. विशेष म्हणजे, यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली, ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला, तरीही गेल्या चार वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे.
लासगाव हे लोकवस्तीचे मोठे गाव असून दररोज अनेक नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक जळगाव, पाचोरा आणि इतर ठिकाणी प्रवास करतात. मात्र, बसस्थानकाची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बसची प्रतीक्षा खुल्या जागेत करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी स्वतंत्र बसस्थानकाची मागणी सातत्याने होत आहे.
लासगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आनंदा सिताराम पैठणकर यांनी यापूर्वी तत्कालीन खासदार, जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर केली होती. तसेच ग्रामपंचायतीनेही बसस्थानक उभारणीसाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र, विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
लासगाव येथील जुने बसस्थानक सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी हटविण्यात आले. त्यानंतर नवीन बसस्थानक उभारण्यासाठी खासदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बसस्थानकाअभावी नागरिकांची गैरसोय होत असून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा.
— आनंदा सिताराम पैठणकर (माजी ग्रामपंचायत सदस्य, लासगाव)
View this post on Instagram
‘जनसमाधान’ बैठकीतील तक्रारीची प्रशासनाकडून तात्काळ दखल –
बसस्थानकाच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आनंदा सिताराम पैठणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे नुकत्याच पार पडलेल्या आयोजित ‘जनसमाधान’ कार्यक्रमात तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जासोबत यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनांच्या प्रती, ग्रामसभेचा ठराव तसेच अन्य संबंधित कागदपत्रे जोडण्यात आली होती.
विशेष म्हणजे, तक्रार दाखल होताच प्रशासनाने या विषयाची तात्काळ दखल घेतली. ही बाब राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
‘जनसमाधान’ बैठकीत लासगाव येथील तक्रारदार यांनी बसस्थानकासंदर्भातील तक्रार मांडली. ही बाब राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून लासगाव येथे लवकरात लवकर बसस्थानक उभारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
— भूषण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा-भडगाव)
बसस्थानक उभारणीला गती मिळण्याची अपेक्षा –
बसस्थानकासाठी उपलब्ध जागेबाबत स्थानिक स्तरावर एकमत होत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याचे बोलले जाते. मात्र, जागेच्या वादात प्रवाशांच्या सुविधांचा बळी जाऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. गावात प्रवासी आहेत, बससेवा उपलब्ध आहे; मात्र बसस्थानक नसल्याने हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. तक्रारीची प्रशासनाने तात्काळ घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज






