मुंबई, 27 फेब्रुवारी : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, या अधिवेशनातून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.
एसआयटी चौकशीचे आदेश –
विधानसभेच्या अधिवेशनात आज मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यांवरून सभागृहात वाद झाला. भाजप आमदार यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लबोल करत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटीमार्फत चौकशीचे करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी दोन वेळा एवढ्या संख्येने आलेल्या मराठा समाजाला सामोरा गेलो आहे. मला मनोज जरांगे यांच्याशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली, असे कुठे चालते का? एकेरी पद्धतीने बोलणे हे शोभत का? मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची भाषा नाही, ही भाषा राजकिय भाषा आहे.






