चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 16 मार्च : बहुप्रतीक्षित असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशभरातील निवडणुकींचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 4 जून रोजी जाहीर होईल.
लोकसभा निवडणुकीची घोषणा –
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये पहिला टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. तर देशभरातील सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
View this post on Instagram
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राज्यात पहिला टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
खान्देशात या दिवशी होणार मतदान –
केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी महाराष्ट्रात पार पडणाऱ्या 5 टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. तर धुळे मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान –
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आजपासून ती लागू झाल्यावर काय बदल होतील?