जळगाव, 30 मार्च : देशभरासह राज्यात दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणूकीची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना जळगाव शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या सोनल उपलवार यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉईन करत व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि यातूनच त्यांची तब्बल एक कोटी पाच लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
जळगावातील हरेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या सोनल भीमराव उपलवार यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील दि 16 फेब्रुवारी ते 28 मार्च यादरम्यान बँक खात्यातून वेळोवेळी एकूण 1 कोटी 5 लाख 23 हजार 341 रुपये स्वीकारले.
दरम्यान, ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तब्बल एक कोटी पाच लाख रूपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी चारजणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : उन्मेष पाटील नाराज? भाजपच्या खासदारकीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचं महत्वाचं भाष्य