ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 जून : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरने दुचाकीला दिलेल्या 15 वर्षीय बालक चिरडून ठार झाला. ही घटना काल रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत आई वडील, बहीण यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, आई-वडिलांच्या देखातच मुलगा चिरडल्या गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात असताना बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकरखाली आल्याने तो चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान राजवीर व जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले व त्यांची पत्नी व मुलगी यांना किरकोळ दुखापत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर अपघाताबद्दल पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी टँकर हे जप्त केले आहे. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनला सदर अपघात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. .
हेही वाचा : मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील, आदित्य ठाकरे यांचा दावा