चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. यासाठी आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यात तहसिल तसेच तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशात बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने संदर्भात महत्वाची माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? –
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आमच्या बहिणींकडून सरकारी कर्मचारी अथवा कुणीही पैसे घेतले तर त्याला निलंबित करून जेलमध्ये टाकून देऊ. त्या माता भगिनींना माझी विनंती आहे की, कुणालाही एक रूपया द्यायचा नाही आणि कुणीही पैसे मागत असेल तर त्याची तक्रार करा, त्याला जेलमध्ये टाकू आणि त्याला बाहेर येऊ देणार नाही, अशा स्पष्ठ इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
काही महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल न केल्यास ऑगस्टमध्ये केले तर त्यांना जुलै महिन्याचे देखील पैसे मिळतील. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या ऐवजी सप्टेंबरमध्ये महिलांचे अर्ज दाखल झाले तर जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे एकूण पैसे मिळतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आम्ही सगळे भाऊ महिलांच्या पाठीशी –
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांना मी आश्वस्त करू इच्छितो की, तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही. पंधरा दिवसात अर्ज भरला नाही म्हणून ही योजना गेली, असा कुणीही विचार करण्याची गरज नाही. यासाठी आम्ही सगळे भाऊ महिलांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच महिला भगिनींना गॅस सिलेंडरची चिंता दुर केली असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या घरातील लक्ष्मी सुखी त्या घरातील समृद्धी पक्की असते. आणि म्हणून लाडकी बहिण योजनमुळे महिला भगिनींमध्ये उत्साह दिसून येतोय. महिलांची गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात महिलांना त्रास होऊ नये, अशा स्वरूपाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
10 लाख तरूणांना अप्रेटिंसशिप करता येणार –
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून लाडका भाऊ योजना देखील लागू करण्यात यावी, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडक्या भावांसाठी पण आम्ही निर्णय घेतला असून त्याअंतर्गत दहा लाख तरूणांना अप्रेटिंसशिप करता येणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून त्यांना 8 ते 10 हजार रूपये मिळणार आहे. तसेच या योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी देखील सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : Video : “तर कुणाच्या थोबाडीत मारायचं?,” एसटी बसचालकांच्या पगाराच्या मुद्यावरून आमदार बच्चू कडू आक्रमक