अमरावती, 2 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशानात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी महिलांनी एकही रूपया देऊ नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनात सांगितले असतानाच लाच प्रकरणाची एक मोठी बातमी समोर आली आहे.
अमरावतीत तलाठ्याने घेतली लाच –
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या वरुड तालुक्याच्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. . तुळशीराम कंठाळे असे निलंबित करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वतः या संदर्भात आज माहिती दिली.
तहसील तसेच तलाठी कार्यालयांमध्ये गर्दी –
महायुतीच्या सरकारकडून 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी महिलांकडून आवश्यक ती कागदपत्रांची जुळवून करण्यात येत आहे. यासाठी महिलांची राज्यभरातील तहसील तसेच तलाठी कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
तलाठी तडकाफडकी निलंबित –
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचे समोर आले. तसेच महिलांकडून पैसे उकळतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, या लाचखोर तलाठ्याची दखल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. यामुळेच त्या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कठोर इशारा –
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आमच्या बहिणींकडून सरकारी कर्मचारी अथवा कुणीही पैसे घेतले तर त्याला निलंबित करून जेलमध्ये टाकून देऊ. त्या माता भगिनींना माझी विनंती आहे की, कुणालाही एक रूपया द्यायचा नाही आणि कुणीही पैसे मागत असेल तर त्याची तक्रार करा, त्याला जेलमध्ये टाकू आणि त्याला बाहेर येऊ देणार नाही, अशा स्पष्ठ इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
हेही वाचा : Breaking : “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी कुणीही पैसे मागितले तर….” एकनाथ शिंदे यांचा कठोर इशारा