मुंबई, 2 जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच राज्य सरकारने महत्वपुर्ण बदल केले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मुदतवाढ –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत करण्यात आलेल्या शिथिल अटी –
- तहसीलदार कार्यालय आणि सरकारी कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने आधी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख ही 15 जुलै होती. मात्र, ही तारीख बदलून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीचा सरकारने निर्णय घेतला आहे.
- आधी या योजनेसाठी 21 ते 60 अशी वयोमर्यादा होती. मात्र, वयोमर्यादा देखील शिथिल करण्यात आली असून 21 ते 65 वर्ष अशी आता वयोमर्यादा राहणार आहे.
- डोमिसाईल सर्टिफिकेट ऐवजी जन्मदाखला तसेच मतदार ओळखपत्र चालणार आहे.
- अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- 5 एकर जमिनीची अटही हटवण्यात आली आहे.
- अडीच लाखांचे उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार आहे.
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला, 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 3. आधिवास प्रमाणपत्र यापैकी एक ग्राह्य धरण्यात येईल.
- सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या मुदतवाढीसाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी विधानभवन समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
हेही वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत घेतली लाच, तलाठी निलंबित