नाशिक, 6 जुलै : राज्यात लाचखोराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत काल एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडले. यामध्ये महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून आणि गटविकास अधिकाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकमध्ये एकाच दिवशी तीन कारवाया झाल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
लाचप्रकरणात महावितरण उपअभियंत्यावर कारवाई –
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण विभागाचा उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडले. किसन भीमराव कोपनर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, पिंपळगाव बसवंत येथे ते कार्यरत होते. या दुकानाचे व्यावसायिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवत त्या ठिकाणी इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी 1 लाख रुपये मागितले होते. लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
एसीबीने कारकूनला पकडले रंगेहाथ –
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कारकून जनार्दन भानुदास रहाटळ याने तक्रारदाराकडे भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी सातशे रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, या लाचप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारकूनला रंगेहाथ पकडले. या कारकूनविरोधात येवला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गटविकास अधिकाऱ्याने घेतली 20 हजारांची लाच –
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येवला पंचायत गटविकास शहरातील समितीचे अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांतर्गत 2022-2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदारामार्फत झालेले विकासकामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के या प्रमाणे 20 हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारली असता एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिला घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या.
हेही वाचा : मंत्री गुलाबराव पाटील यांची खासदार राहुल गांधींवर टीका, म्हणाले, “लोकसभेच्या निकालाने आलेली सूज…”