जळगाव, 14 जुलै : सरकारने जर आरक्षण दिले नाही तर स्थगित केलेले उपोषण अंतरवालीत 20 तारखेला पुन्हा सुरु करणार आहे. आता कठोर उपोषण होईल आणि आता मेलो तरी माघार नाही. पण मराठ्यांवर गुलाल मी टाकणार आहे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
मंत्री गुलाबराव पाटील याबाबत म्हणाले की, हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडे वेट अँड वॉच करावे लागेल. ओबीसी आणि मराठा समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला आहे तसचे यापुढेही कायम राहिला पाहिजे, असेच त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे.
दहा टक्के आरक्षण –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आरक्षणासाठी सरकार ज्या पद्धतीने शक्य होईल, त्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आरक्षण दिले होते. मात्र, कालांतराने ते टिकले नाही. आताही सरकारमधील सर्व मंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेले आहे.
दोन्ही बाजूने शांतता पाळली पाहिजे –
मराठा आरक्षणावर पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे. शेवटी हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडे वेट अँड वॉच करावे लागेल. ओबीसी आणि मराठा समाज हे दोघेही भाऊ असल्याने त्यांच्यात कटूता निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने शांतता पाळली पाहिजे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निवडणुकीत उमेदवार उभा करायचा की नाही हा त्यांचा विषय असून इतर सुद्धा आपले भाऊच आहे हे त्यांनी मानले पाहिजे. ओबीसी आणि मराठा समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा : ‘आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेट कुणीही…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?