ढाका, 5 ऑगस्ट : बांगलादेशमध्ये उसळलेल्या यादवी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उफाळून आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना या त्यांच्या बहिणीसह काहीवेळापूर्वीच हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशची सूत्रे सोडल्यानंतर आता देशात लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा –
सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत शेख हसीना सरकारच्या भूमिकेविरोधात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या. हसीना या भारताकडे रवाना झाल्या असून त्या भारतात आश्रय घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते.
काय आहे नेमका वाद? –
बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला. मात्र, तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरू झाला. दरम्यान, काल रविवारी घडलेल्या हिंसक घटनेत तब्बल 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देशात निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
भारत सरकारचे आवाहन –
सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत शेख हसीना सरकारच्या भूमिकेविरोधात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून येत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. देशाची राजधानी ढाका, बोगरा, पबना, रंगपूर, मगुरा, कोमिला, बरिसाल आणि फेनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून बांगलादेशात जाऊ नये, असे आवाहन भारत सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
बांगलादेशात लष्करी राजवट लागणार?
बांगलादेशातील वाढत्या हिंसचाराच्या पार्श्वभूमीवर देशात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे. आंदोलकांना थोपवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरले असून बांगलादेशात सत्ता स्थापनेसाठी लष्कराने हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : जवान सुटीवर आला अन् पत्नी व तिच्या प्रियकराने घात केला, कोल्हापुरातील हादरवणारी घटना