सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 13 ऑगस्ट : आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी उपस्थितीत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत पारोळा शहर पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. आज अखेर या योजनेचे 75 ते 80 टक्के काम पूर्णत्वास आले असून शहराला ऑगस्ट अखेरपर्यंत 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. तसेच ऑक्टोबर अखेरपर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
पाणी पुरवठ्यासाठी 53.60 कोटी मंजूर –
पारोळा शहराचा पाणी प्रश्न हा अतिशय ज्वलंत विषय असून हा पाणीप्रश्न कायमचाच मिटावा व शहराला शिरपूर प्रमाणेच गुणवत्तेपूर्ण शुध्द पाणीपुरवठा दैनंदिन व्हावा यासाठी आ. चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी योग्य तो आवश्यक पाठपुरावा करत पारोळा शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करून 53.70 कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली. या कामाची तातडीने सुरुवात करून शहराला त्वरित पाणीपुरवठा कसा उपलब्ध होईल, यासाठी हे काम प्रत्यक्षात सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक आयोजित करीत, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेपर्यंत अहोरात्र प्रयत्न केले.
पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक –
आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर शिंदे, पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगरअभियंता सुमित पाटील, मक्तेदार प्रतिनिधी रंजन महाजन, प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी हेमंत कोल्हे, गजानन रबाडे, तुषार शिंपी यांचेसमवेत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सध्याचे सुरु असलेले काम व सदरील योजना पूर्णत्वास येण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचा सूचना यावेळी आमदार पाटील यांनी दिल्या.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत