जळगाव : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहमध्ये दाखल झालेल्या एका विद्यार्थ्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीक विजयराव गोरडे (वय-19, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना काल बुधवारी (11 सप्टेंबर) रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
काय आहे संपूर्ण घटना –
प्रतीक विजयराव गोरडे हा विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील रहिवासी होता. त्याने विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. तसेच तो विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह क्रमांक 3 मधील खोली क्रमांक T 447 मध्ये दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. त्याच्या खोलीमध्ये 5 सहकारी राहतात. काल रात्री बुधवारी विद्यार्थ्यांनी वसतिगृहात गणपतीची आरती केली. त्यानंतर जेवण केले.
यानंतर काही वेळाने विद्यार्थी हे वसतिगृहातील खोलीकडे परतले. यावेळी प्रतीकच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. काही जणांनी खिडकीचा काच फोडून पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रतीक दिसून आला. यानंतर विद्यार्थ्यांनी त्याला खाली उतरवले आणि विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रतीकला विद्यापीठात सोडण्यासाठी त्याचे आई-वडीलही आले होते. मुलाला येथे पोहोचवल्यानंतर परतत असताना त्यांना आणि प्रतीकला अश्रू अनावर झाले होते. तसेच प्रतीकने विद्यापीठातील वसतिगृहाच्या खोलीमध्ये राहण्यासाठी बुधवारी सकाळी गादी आणि इतर साहित्य खरेदी केले होते. दिवसभर सर्व व्यवस्थित असताना रात्री त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला, अद्याप हे समजू शकले नाही. या घटनेमुळे विद्यापीठात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. तसेच याबाबतची माहिती पोलिसांनाही मिळताच पाळधी पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शहीद जवान अरूण बडगुजर यांना अखेरचा निरोप, चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार