अक्राणी, 24 सप्टेंबर : अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित एकूण 11 वनदावे तात्काळ निकाली काढा, या मागणीसाठी वनदावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडले आहे. टेंबऱ्या वळवी, बारक्या वळवी, बारक्या पावरा, वांगऱ्या पाडवी, जोमा वळवी, बिंद्या वळवी, उतऱ्या वळवी, गारद्या पाडवी, रिहज्या पावरा, तुबड्या वळवी, बांग्या वळवी, आदी 11 वनदावेदारांसरह दिलवरसिंग पाडवी आदी जुगनी गावातील प्रलंबित वनदावेदार उपोषणास बसले आहे.
उपोषणादरम्यान उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी उपोषणकर्त्यांना चर्चेस बोलावले. त्यात 11 पैकी 7 दावे पात्र तर 4 दावे अपात्र झाल्याची माहिती दिली. पात्र दाव्यांवर सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांची स्वाक्षरी राहिल्याचे सांगितले. 406 वनदावे फाईल्स अहिरे वनपाल काकडदा वनविभाग क्षेत्र यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून त्यांच्या स्वतःच्याच राहत्या घरात दडपून ठेवल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अक्राणी तालुक्यातील मौजे जुगनी येथील एकुण 11 वनदावे आपल्या कार्यालयात गेल्या 1 वर्षांपासून प्रलंबित आहेत. जुगनी येथील वनदावे दारांनी आपल्याकडे वारंवार पत्र व्यवहार करून वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अर्ज केलेले आहेत. जुगनी येथील वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी दिनांक 19 जुलै 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिनांक 8 जुलै 2024 रोजीच्या उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या पत्रान्वये दिसून येते.
बैठक आयोजित करूनही सदर दाव्यांबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याकारणाने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी जुगनी येथील वनदावेदावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत, असे दिनांक 17 सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार समजते. सदर वनहक्क दावे दारांना वारंवार आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला जात आहे. त्यांचे वनहक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत, असा आरोप वनदावेदारांकडून करण्यात येत आहे.
म्हणून याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याऱ्या लिपिक व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदर वनदाव्यांबाबत चालू स्थितीतील माहिती वनदावेदारांना देण्यात यावी व अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील एकुण 11 वनहक्क दावे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. हीच नम्र विनंती.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. वनदावे निकाली काढा, नाहीतर खुर्च्या खाली करा, या अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय अशा जोरदार घोषणाबाजी उपोषण कर्त्यांनी दिल्या. उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत