मुंबई, 30 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ बैठका सुरू आहेत. आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता-गोमाते’चा दर्जा जाहीर केला आहे. दरम्यान, निवडणुकीआधीच हा निर्णय घेण्यात आल्याने सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.
गोमातेला मिळाला ‘राज्यमातेचा दर्जा’ –
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ हा दर्जा देण्यात आला आहे. त्यासंदर्भातील जीआर देखील राज्य सरकारने काढलाय. हिंदू धर्मामध्ये गाय पवित्रतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. भारतीय परंपरेत गायीला खूप मोठे महत्व आहे. देशी गायीचं दूध पौष्टिक असतं. मानवी पोषणासाठी दूध अत्यंत महत्वाचे असते आणि गायीचे अनेक फायदे मानवाला होत असतात. त्या सर्व बाबींचा विचार करूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना संरक्षण मिळेल, असे मत देखील विहिंपने मांडले आहे.
आचारसंहितेपुर्वीच मोठे निर्णय –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य मंत्रिमंडळात बैठकीचे सत्र सध्या सुरु आहे. सोमवारी आज सकाळीही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्याने मोठे निर्णय घेण्यात आले. विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत असून त्याआधी निवडणुका होणार आहेत. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल 38 निर्णय घेण्यात आले आहेत.
हेही पाहा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता, आजचा काय आहे नेमका हवामान अंदाज?