मुंबई, 21 जानेवारी : राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांना वेळोवेळी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने e-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, अनेक महिलांनी e-KYC करताना चुकून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. परिणामी, या महिलांना योजनेचा लाभ बंद होण्याची भीती होती. आता मात्र राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिला आहे.
मंत्री अदिती तटकरेंची माहिती –
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 20, 2026
अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी –
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही प्रकरणांमध्ये e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थी महिलांची योजनेच्या निकषांनुसार अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.






