भडगाव, 16 फेब्रुवारी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र” मेळाव्यासाठी काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त भडगाव येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांना विधानभवनात पाठवायचंय, असे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
वैशाली सुर्यवंशी काय म्हणाल्या? –
भडगाव येथील सभेच्या सुरूवातीला वैशाली सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करणे, मोतीबिंदू मोफत ऑपरेशन, अपंगांना सायकल वाटप, शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना मदत, पत्रकार कक्षाची स्थापना, यासारखी अनेक कामे मी स्वखर्चातून केली, असे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी माझे दुरगामी व्हिजन असल्याचेही त्या म्हणाल्या.
‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’ –
महाराष्ट्राने मन पक्क बनवलंय की, राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बसवायचेच. वैशाली ताईंनी सांगितल्याप्रमाणे, लोकांच्या सेवा स्वखर्चातून करत आहेत. पण हे शेवटचे वर्ष आहे. 2024 मध्ये सरकारचा निधी आपल्याला इथं आणायचाच आहे. अधिकृत निधी आणायचाय. आणि वातावरण तसे बनले आहे. कारण जेव्हा जेव्हा मी या मतदारसंघात येतो तेव्हा माझ्या कानावर येतं की ताईंना आता विधानभवनात पाठवायचंय, हे पक्क आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.