जळगाव, 19 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून महसूल प्रशासनकडून थेट बांधावर जाऊन पंचानामे करण्यात येत आहेत. दरम्यान, आज पुन्हा जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी –
गेल्या 20-25 दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा केली जात असताना मागील तीन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. अशातच शनिवार तसेच रविवार रात्री जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून पाच महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. ज्यामध्ये रावेर तालुक्यातील खिरोदा, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, गाळण तसेच भडगाव तालुक्यातील कजगाव या मंडळांचा समावेश आहे. यासोबतच सलग तीन दिवस पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना देखील पूर आला.
नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाकडून पंचानामे –
जळगाव जिल्ह्यात 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. नुकसानग्रस्त भागात प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. यासोबतच बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत –
खरीप हंगामाच्या सुरूवातील पिके बहरल्याने अचाकन पावसाचा खंड पडल्याने कापूस, मूग, उडीद तसेच मका आदी पिके कोमजू लागली होती. यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची प्रतिक्षा केली जात होती. मात्र, मोठ्या विश्रांतीनंतरच्या पावसाने अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागात मका पिके आडवे पडले आहे तर काही काही भागात कापूस पिक पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून नुकसानीची भरपाई मिळावी, अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
राज्यातील विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे शहर, कोल्हापूर, मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.