मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्रातही पहिलीपासून मराठी-इंग्रजीसोबत हिंदी विद्यार्थ्यांना शिकावी लागणार असून शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केलाय. यावरूनच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका करत त्यांच्याविरोधात तक्रार दिलीय.
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले? –
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 16 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी करण्याचे ठरविले. यानुसार, प्राथमिक शिक्षणाला अर्थात पहिल्याच्या 2025-26 या वर्षांत हिंदी या विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना एक भाषा अधिकची शिकण्यासाठीची उपलब्धीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, ह्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केला.
राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचे –
राज ठाकरेंनी स्वतःच्या फायद्यासाठी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे. राज ठाकरेंनी हिंदी भाषेला विरोध दर्शवण्यासाठी ट्विट करत त्यांची भूमिका मांडली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत तसेच बेकायदेशीर वर्तवणूक केले आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्यात हिंदी भाषेचा कायद्याचा शासन निर्णयाचे दहन केले. मात्र, एक अधिक भाषा शिकत असायला मिळत असताना तालिबानी पद्धतीने वागणारे हे वर्तन राज ठाकरेंचं असल्याची टीका सदावर्तेंनी केलीय. तसेच राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही, असा प्रश्न उपस्थित केलाय.
गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत तक्रार –
दरम्यान, विद्यार्थांचे मनबोल खचवणे, पालकांमधील भीती निर्माण करण्याचे काम तसेच जातीय तेढ निर्माण करणारं कृत्य त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय, असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.