सातारा, 22 सप्टेंबर : महाराष्ट्राची कन्या आणि प्रसिद्ध गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका मोहिते ही 8000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेली 6 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रियंकाने एक मोठी कामगिरी केली आहे.
प्रियंका मंगेश मोहिते हिने तिचे मार्गदर्शक अंग दावा शेर्पा यांच्यासह आज सकाळी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास नेपाळमधील माउंट मनासलू शिखर यशस्वीरित्या सर केले. या शिखराची उंची ही तब्बल 8 हजार 163 मीटर असून हे जगातील 8 वे सर्वोच्च शिखर आहे.
33 वर्षीय प्रियंका मोहिते हिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. प्रियंकाला 2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने याआधी प्रियंका मोहिते हिने 2022 मध्ये जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर केले होते. या शिखराची उंची 8 हजार 586 मीटर आहे.
प्रियंका मोहिते हिची कामगिरी –
प्रियंका मोहिते या तरुणीने एप्रिल 2021 मध्ये जगातील दहावे सर्वोच्च शिखर असलेले अन्नपूर्णा शिखर सर केले होते. त्याची उंची 8 हजार 91 मीटर आहे. तसेच तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील सर केले आहे. माउंट एरेस्टची उंची 8 हजार 849 मीटर आहे. तसेच तिने ल्होत्से शिखरही सर केले आहे. याची उंची 8 हजार 516 मीटर आहे.
इतकेच नव्हे तर वयाच्या 30व्या वर्षी प्रियंकाने 8 हजार 485 मीटर उंचीचे मकालू शिखरही सर केले आहे. यासोबतच तिने 8 हजार 895 मीटर उंचीवरील किलीमांजारो पर्वतावरही चढाई केली आहे. यानंतर आज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास प्रियकांने जगातील आठव्या क्रमांकाचे मनास्लू शिखर सर केले आहे. यामुळे 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची 6 शिखरे सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.