चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात सातत्याने लाचप्रकरणांमध्ये वाढ होत असताना आता 2025 या वर्षभरात जळगाव लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईंची आकडेवारी समोर आली आहे. जळगाव एसीबीने सन 2025 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम राबवत एकूण ४५ सापळा कारवाया केल्या असून, या कारवायांमध्ये ७८ आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी इसम यांचा कारवाईत समावेश आहे.
जळगाव लाचलुचपत प्रतिंबध विभागाने केलेल्या या ४५ सापळा कारवायांमधील एकूण आरोपींपैकी वर्ग १ चे ३, वर्ग २ चे ६, वर्ग ३ चे ३५, वर्ग ४ चे ४ अधिकारी-कर्मचारी, इतर लोकसेवक १३ तसेच १७ खाजगी इसमांचा समावेश आहे. एकूण, ७४ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ८ ने वाढ –
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटने सन २०२५ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये सापळा कारवाया करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.जळगाव एसीबीने एकूण ४५ सापळा कारवाया करत ७८ आरोपींना अटक केली. यामध्ये सर्वाधिक कारवाई महसूल विभागात 13 आरोपींना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, सन २०२४ मध्ये ३७ गुन्ह्यांमध्ये ६१ आरोपींवर सापळा कारवाई करण्यात आली होती. त्या तुलनेत सन २०२५ मध्ये ४५ गुन्ह्यांमध्ये ७८ आरोपींवर कारवाई करण्यात आल्याने मागील वर्षाच्या तुलनेत ८ ने वाढ झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन –
ही संपूर्ण कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव युनिटचे अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुटीच्या दिवशी तक्रार किंवा माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधता येणार आहे. तसेच पोलीस उपअधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर (मो. ९७०२४३३१३१), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा लँडलाईन क्रमांक ०२७७-२२२८४७७ आणि टोल फ्री मोबाईल क्रमांक ७५८८६६१०६४ यावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






