जळगाव, 16 जुलै: केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २७ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात यापूर्वीही प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, संजय गांधी योजना (नगरपालिका क्षेत्र, जळगाव शहर) अंतर्गत लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांपैकी अद्याप केवळ ५० टक्के लाभार्थ्यांनीच हयातीचे दाखले सादर केले आहेत.
हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन –
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नाही, त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सत्यापन अॅप (Verification App) उपलब्ध असल्यास त्याद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने, तसेच संजय गांधी योजना कार्यालय, नगरपालिका क्षेत्र, जळगाव शहर (रेल्वे स्टेशन रोड) येथील ग्राम महसूल अधिकारी, संगणक परिचालक अथवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रातून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन पद्धतीने काढून दि. २१ जुलै २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात जमा करावे.
निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता असल्याने हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन तहसीलदार, (संजय गांधी योजना) रुपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.






