जळगाव, 16 जुलै: राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना अखेर वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने गावागावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. २४ जुलैला प्रारूप तर ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
नेमकी बातमी काय? –
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी आधार मानण्यात येणार आहे. या मतदार यादीचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजन करून ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत.
यापूर्वी ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही ठिकाणी त्रुटी किंवा अनवधानाने वगळल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडतही पार पडली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्यास विलंब झाल्याने अशा ग्रामपंचायतींसाठी २४ जुलैपर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचल्या आहेत.
मतदार यादीचा कार्यक्रम –
- २४ जुलै – प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- २४ ते २९ जुलै – हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार
- ४ ऑगस्ट – हरकतींची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
मतदार यादी तयार करण्यासाठी विशेष संगणक प्रणालीचा वापर –
मतदार यादी तयार करण्यासाठी ‘महाआयटी’ने विकसित केलेल्या विशेष संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार असून, त्यानंतर तहसील कार्यालयांना स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून दिले जाईल. संबंधित तहसीलदार ग्रामपंचायतीनिहाय मास्टर डेटा भरतील आणि विधानसभा मतदार यादीचा ‘मदर रोल’ डाउनलोड करून ‘कंट्रोल चार्ट’च्या आधारे प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाईल.
मतदार यादी तयार करताना विशेष काळजी घेण्याचे आदेश –
मतदार यादी तयार करताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी आयोगाने प्रशासनाला कठोर सूचना दिल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश झाला पाहिजे, तसेच बाहेरील कोणत्याही मतदाराचे नाव यादीत येणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेदरम्यान विधानसभा मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा नाव-पत्त्यात बदल करणे शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींमध्ये केवळ तांत्रिक किंवा लेखनिक चुका, चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेला मतदार किंवा संबंधित प्रभागातील पात्र मतदाराचे नाव वगळले गेल्यास अशाच मर्यादित दुरुस्त्या करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी २४ जुलैनंतर प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि प्रभाग तपासून आवश्यक असल्यास वेळेत हरकत नोंदवावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
याशिवाय प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून, स्थानिक वृत्तपत्रे आणि केबल टीव्हीच्या माध्यमातूनही नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित मुदतीत, पारदर्शक आणि बिनचूक पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. तसेच संपूर्ण पूर्वतयारीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला नियमितपणे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
4 ऑगस्टनंतर कधीही ग्रामपंचायत निवडणुकींची घोषणा? –
राज्य निवडणूक आयोगाच्या या हालचालीनंतर राज्यातील ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेषतः २०२४, २०२५ आणि 2026 पासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत असल्याने स्थानिक राजकारण पुन्हा एकदा रंगात येणार आहे.
जरी आयोगाने अद्याप निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नसला, तरी ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय






