जळगाव, 4 ऑगस्ट : ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्त विद्यापीठास शासनाची अमळनेर येथील 2 एकर जागा गट नंबर 376/1 येथे विद्यापीठास उपलब्ध करून दिली आहे.
मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन –
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान, मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी 9 वाजता अमळनेर येथील मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास आणि पंचायती राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, जळगावच्या खासदार स्मिता वाघ, विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, विधानसभा आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, किशोर पाटील, लताबाई सोनवणे, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे हे असणार आहे, अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, विभागीय संचालक डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.
सदर उपकेंद्रामुळे खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व 250 च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ या विद्यार्थ्यांना होणार आहे.
हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?