नंदुरबार, 6 ऑक्टोबर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नंदुरबार जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. दरम्यान, या अपघातात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडल्याचे दृश्य समोर आले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यावरून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए. पी. 31 पी. जी. 0869 या क्रमांकाच्या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या सुमारे 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
100 हून अधिक मेंढ्या जागीच ठार –
अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होतात. मात्र, तर या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून एकच शोककळा पसरली आहे.
मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर –
नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या या घटनेतील मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. दरम्यान, मागून येणारा एका भरधाव ट्रकने त्याच्या 100 हून अधिक मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडल्या आहेत. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातकडे जात असताना ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर हा अपघात झाल्याचे समजते. याप्रकरणी घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे मेंढ्यांचे पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत