जळगाव, 18 डिसेंबर : गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा दूध संघाटी निवडणुकीचा निकाल लागला. यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना धक्का देत भाजप-शिंदे गटाने मोठा विजय मिळवला. 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार याठिकाणी निवडून आले. यानंतर दूध संघाचे चेअरमन कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. तर जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवड झाली आहे.
काय म्हणाले मंगेश चव्हाण –
या संपूर्ण प्रक्रियेत आमचे नेते गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ज्या अपेक्षांनी आम्हाला मतदान करण्यात आले, त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या जातील. येणाऱ्या काळात बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर देऊ, असा विश्वास आमदार आणि नवनिर्वाचित चेअरमन मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या दूध संघाच्या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा या निवडणुकीत पराभव केला. तसेच खडसे यांच्या गटाला फक्त 4 जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्काा मानला जात आहे.
हेही वाचा – त्यांनी मला आमदारकी दिलेली नाही, खडसेंचे मंत्री गुलाबराव पाटलांना प्रत्यत्तर
संपूर्ण राज्याचे होते लक्ष –
दूध संघाच्या या निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात यासाठी जोरदार रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर यात भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळवला आहे. यानंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.