नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या निर्णयामुळे नवे उपराष्ट्रपती कोण ठरणार याबाबत चर्चांना अधिकच उधाण आले. देशभरातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असताना आता दिल्लीत या घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सोपवला होता. त्यानंतर आज दिल्लीत भाजपाच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या वतीने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी घोषित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास –
राधाकृष्णन गेली तीन दशके भारतीय जनता पक्षाशी सक्रीयपणे जोडलेले आहेत. तमिळनाडूमधील कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय त्यांनी काही काळ भाजपाच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
2023 मध्ये राज्यपालपदी निवड –
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या काळात देशभरात नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर 18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. सुमारे दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वपूर्ण राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
‘असे’ आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक –
- नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025.
- नामांकन अर्ज छाननीची तारीख 22 ऑगस्ट 2025.
- उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025.
- मतदानाची तारीख 9 सप्टेंबर 2025 असून त्यानंतर मतमोजणी पार पडणार आहे.