ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 9 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. परवाच सुट्टीवर आलेल्या एका जवानाचा शेतातून परत येत असताना वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली याठिकाणी ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली.
काय आहे संपूर्ण घटना? –
मान्सूनच्या परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात सर्वत्र हजेरी लावल्यानंतर पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचे सावट आहे. अशा परिस्थितीत आज सायंकाळच्या सुमारास पाचोरा तालुक्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे वातावरण झाले होते. मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होत होता. याच दरम्यान, पाचोरा तालुक्यातील खडकी अंतुर्ली या गावी एका जवानाचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण आनंदा बोरसे असे मृत जवानाचे नाव आहे. ते सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये बिहारमध्ये कार्यरत होते. ते परवाच सुट्टीवर आले होते. दरम्यान, आज ते शेतात गेले होते. शेतातून परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भूषण आनंदा बोरसे हे परवाच सुट्टीवर आले होते. दरम्यान, आज त्यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पाचोरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन या घटनेची नोंद केल्याची माहिती मिळाली आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत